श्री राम आरती (५)

जय देव जय देव जय आत्मारामा ।

जय देव जय देव जय आत्मारामा ।
निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ध्रु०॥

नाना देही देव एक विराजे ।
नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ।
नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे ।
अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे । जय देव० ॥१॥

बहुरूपी बहुगुणी बहुतां काळांचा ।
हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥
युगानुयुगीं आत्मराम आमुचा ।
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥२॥