श्री तुळशी आरती (३)

वृंदावनवासी जय माये तुळशी ।

वृंदावनवासी जय माये तुळशी ।
शिवहरिब्रह्मादीकां तूं वंद्य होसी ॥
मृत्युलोकी प्रगटुनि भक्ता उद्धरिसी ।
तुझें दर्शन होतां जळती अघराशीं ॥१॥

जय देव जय देवी जय तुळशी माते ।
करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते ॥ध्रु०॥

कार्तिकशुक्लद्वादशि कृष्णाशीं लग्न ।
तुझे वृंदावनी निशिदिनिं श्रीकृष्ण ॥
स्वर्गाहुनी वृष्टी करिती सुरगण ।
भक्त चिंतन करितां करिसी पावन ॥ जय० ॥२॥

त्रिभुवनिं तुझी सेवा करिती त्रिकाळ ।
त्यांतें सुख देऊनी तारी गोपाळ ॥
तुझें स्तवन ऎकुनि कांपति कळिकाळ ।
पावन करि मज म्हणे मोरो बल्लाळ ॥ जय० ॥३॥