श्री लक्ष्मी आरती (३)
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥
कमलाकारें जठरीं जन्मविला धाता ।
सहस्त्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ॥१॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरूपें तूं स्थूलसूक्ष्मी ॥ध्रु०॥
मातुलिंग गदायुत खेटक रविकिरणी ।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकदशना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ जय० ॥२॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारीं ॥
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ जय० ॥३॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं ।
मारीं दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं ॥
वारीं मायापटल प्रणमत परिवरीं ।
हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं ॥ जय० ॥४॥
चतुराननें कुत्सित कर्मांच्या ओळी ।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळीं ।
पुसोनि भरणातळी पदसुमनें क्षाळीं ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ जय० ॥५॥
लक्ष्मी