श्री दुर्गा चालीसा
श्रीगणेशाय नमः ।
श्रीगणेशाय नमः ।
श्री दुर्गायै नमः ।
नगरांत प्रवेशले पंडुनंदन ।
तो देखिले दुर्गास्थान ।
धर्मराज करी स्तवन ।
जगदंबेचे तेधवा ॥१॥
जय जय दुर्गे भुवनेश्वरी ।
यशोदा गर्भ संभवकुमारी ।
इंदिरा रमण सहोदरी ।
नारायणी चंडिकेंऽबिके ॥२॥
जय जय जगदंबे विश्र्व कुटुंबिनी ।
मूलस्फूर्ति प्रणवरुपिणी ।
ब्रह्मानंदपददायिनी ।
चिद्विलासिनी अंबिके तू ॥३॥
जय जय धराधर कुमारी ।
सौभाग्य गंगे त्रिपुर सुंदरी ।
हेरंब जननी अंतरी ।
प्रवेशीं तू आमुचे ॥४॥
भक्तह्रदयारविंद भ्रमरी ।
तुझे कृपाबळे निर्धारी ।
अतिगूढ निगमार्थ विवरी ।
काव्यरचना करी अद्भुत ॥५॥
तुझिये कृपावलोकनेंकरुन ।
गर्भांधासी येतील नयन ।
पांगुळा करील गमन ।
दूर पंथे जाऊनी ॥६॥
जन्मादारभ्य जो मुका ।
होय वाचस्पतिसमान बोलका ।
तूं स्वानंदसरोवर मराळिका ।
होसी भाविकां सुप्रसन्न ॥७॥
ब्रह्मानंदे आदिजननी ।
तव कृपेची नौका करुनि ।
दुस्तर भवसिंधु उल्लंघूनी ।
निवृत्ती तटां जाइजे ॥८॥
जय जय आदिकुमारिके ।
जय जय मूलपीठनायीके ।
सकल सौभाग्य दायीके ।
जगदंबिके मूलप्रकृतिके ॥९॥
जय जय भार्गवप्रिये भवानी ।
भयनाशके भक्तवरदायिनी ।
सुभद्रकारिके हिमनगनंदिनी ।
त्रिपुरसुंदरी महामाये ॥१०॥
जय जय आनंदकासारमराळिके ।
पद्मनयने दुरितवनपावके ।
त्रिविधतापभवमोचके ।
सर्व व्यापके मृडानी ॥११॥
शिवमानसकनकलतिके ।
जय चातुर्य चंपककलिके ।
शुंभनिशुंभदैत्यांतके ।
निजजनपालके अपर्णे ॥१२॥
तव मुखकमल शोभा देखोनी ।
इंदुबिंब गेले विरोनी ।
ब्रह्मादिदेव बाळें तान्ही ।
स्वानंदसदनी निजविसी ॥१३॥
जीव शिव दोन्ही बाळकें ।
अंबे त्वां निर्मिली कौतुकें ।
स्वरुप तुझे जीव नोळखे ।
म्हणोनि पडला आवर्ती ॥१४॥
शिव तुझे स्मरणीं सावचित्त ।
म्हणोनि तो नित्यमुक्त ।
स्वानंदपद हातां येत ।
तुझे कृपेनें जननिये ॥१५॥
मेळवूनि पंचभूतांचा मेळ ।
त्वां रचिला ब्रह्मांडगोळ ।
इच्छा परततां तत्काळ ।
क्षणें निर्मूळे करिसी तूं ॥१६॥
अनंत बालादित्यश्रेणी ।
तव प्रभेमाजी गेल्या लपोनि ।
सकल सौभाग्य शुभकल्याणी ।
रमारमणवरप्रदे ॥१७॥
जय शंबरि पुहर वल्लभे ।
त्रैलोक्य नगरारंभस्तंभे ।
आदिमाये आत्मप्रिये ।
सकलारंभे मूलप्रकृती ॥१८॥
जय करुणामृतसरिते ।
भक्तपालके गुणभरिते ।
अनंतब्रह्मांड फलांकिते ।
आदिमाये अन्नपूर्णे ॥१९॥
तूं सच्चिदानंदप्रणवरुपिणी ।
सकल चराचर व्यापिनी ।
सर्गस्थित्यंत कारिणी ।
भवमोचिनी ब्रह्मानंदे ॥२०॥
ऐकोनि धर्माचे स्तवन ।
दुर्गा जाहली प्रसन्न ।
म्हणे तुमचे शत्रू संहारीन ।
राज्यीं स्थापीन धर्माते ॥२१॥
तुम्ही वास करा येथ ।
प्रगटी नेदीं जनांत ।
शत्रू क्षय पावती समस्त ।
सुख अद्भुत तुम्हां होय ॥२२॥
त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण ।
तें जे त्रिकाल करिती पठन ।
त्यांचे सर्व काम पुरवीन ।
सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥२३॥
दुर्गा