श्री चंद्रदेव आरती

जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।

जय देव जय देव जय श्रीशशिनाथा ।
आरतीं ओंवाळूं पदिं ठेउनि माथा ॥ध्रु०॥

उदयीं तुझ्या हृदयीं शीतलता उपजे ।
हेलावुनि क्षीराब्धी आनंदें गर्जे ।
विकसित कुमुदिनि देखुनि मन तें बहु रंजे ।
चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय० ॥१॥

विशेष महिमा तुझा न कळे कोणासी ।
त्रिभुवनिं द्वादशराशी व्यापुनि आहेसी ॥
नवही ग्रहांमध्ये उत्तम तूम होसी ।
तुझें बल वांछिती सकळहि कार्यासी ॥ जय० ॥२॥

शंकरगणनाथादिक भूषण मिरवीती ।
भाळीं मौळी तुजला संतोषें धरिती ॥
संकटनामचतुर्थीस पूजन जे करिती ।
संतति संपद पावुनि भवसागर तरती ॥ जय० ॥३॥

केवळ अमृतरूप अनुपम्य वळसी ।
स्थावर जंगम यांचें जीवन आहेसी ॥
प्रकाश अवलोकितां मन हें उल्हासीं ।
प्रसन्न हो‍उनि आतां लावी निजकांसीं ॥ जय० ॥४॥

सिंधूतनया इंदू बंधु श्रीयेचा ।
सुकीर्तिदायक नायक उडुगण जो यांचा ॥
कुरंगवाहनचंद्रा अनुचित हे वाचा ।
गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ॥ जय० ॥५॥