श्री लक्ष्मी आरती (३)
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता । पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥ कमलाकारें जठरीं जन्मविला धाता । सहस्त्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ॥१॥ जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरूपें तूं स्थूलसूक्ष्मी ॥ध्रु०॥ मातुलिंग गदायुत खेटक रविकिरणी । झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ॥ माणिकदशना सुरंगवसना मृगनयनी । शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ जय० ॥२॥ तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी । सांख्य म्हणती प्रकृति निर्गुण निर्धारीं ॥ गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ जय० ॥३॥ अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं । मारीं दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं ॥ वारीं मायापटल प्रणमत परिवरीं । हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं ॥ जय० ॥४॥ चतुराननें कुत्सित कर्मांच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळीं । पुसोनि भरणातळी पदसुमनें क्षाळीं । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ जय० ॥५॥