श्री दुर्गा चालीसा
श्रीगणेशाय नमः । श्री दुर्गायै नमः । नगरांत प्रवेशले पंडुनंदन । तो देखिले दुर्गास्थान । धर्मराज करी स्तवन । जगदंबेचे तेधवा ॥१॥ जय जय दुर्गे भुवनेश्वरी । यशोदा गर्भ संभवकुमारी । इंदिरा रमण सहोदरी । नारायणी चंडिकेंऽबिके ॥२॥ जय जय जगदंबे विश्र्व कुटुंबिनी । मूलस्फूर्ति प्रणवरुपिणी । ब्रह्मानंदपददायिनी । चिद्विलासिनी अंबिके तू ॥३॥ जय जय धराधर कुमारी । सौभाग्य गंगे त्रिपुर सुंदरी । हेरंब जननी अंतरी । प्रवेशीं तू आमुचे ॥४॥ भक्तह्रदयारविंद भ्रमरी । तुझे कृपाबळे निर्धारी । अतिगूढ निगमार्थ विवरी । काव्यरचना करी अद्भुत ॥५॥ तुझिये कृपावलोकनेंकरुन । गर्भांधासी येतील नयन । पांगुळा करील गमन । दूर पंथे जाऊनी ॥६॥ जन्मादारभ्य जो मुका । होय वाचस्पतिसमान बोलका । तूं स्वानंदसरोवर मराळिका । होसी भाविकां सुप्रसन्न ॥७॥ ब्रह्मानंदे आदिजननी । तव कृपेची नौका करुनि । दुस्तर भवसिंधु उल्लंघूनी । निवृत्ती तटां जाइजे ॥८॥ जय जय आदिकुमारिके । जय जय मूलपीठनायीके । सकल सौभाग्य दायीके । जगदंबिके मूलप्रकृतिके ॥९॥ जय जय भार्गवप्रिये भवानी । भयनाशके भक्तवरदायिनी । सुभद्रकारिके हिमनगनंदिनी । त्रिपुरसुंदरी महामाये ॥१०॥ जय जय आनंदकासारमराळिके । पद्मनयने दुरितवनपावके । त्रिविधतापभवमोचके । सर्व व्यापके मृडानी ॥११॥ शिवमानसकनकलतिके । जय चातुर्य चंपककलिके । शुंभनिशुंभदैत्यांतके । निजजनपालके अपर्णे ॥१२॥ तव मुखकमल शोभा देखोनी । इंदुबिंब गेले विरोनी । ब्रह्मादिदेव बाळें तान्ही । स्वानंदसदनी निजविसी ॥१३॥ जीव शिव दोन्ही बाळकें । अंबे त्वां निर्मिली कौतुकें । स्वरुप तुझे जीव नोळखे । म्हणोनि पडला आवर्ती ॥१४॥ शिव तुझे स्मरणीं सावचित्त । म्हणोनि तो नित्यमुक्त । स्वानंदपद हातां येत । तुझे कृपेनें जननिये ॥१५॥ मेळवूनि पंचभूतांचा मेळ । त्वां रचिला ब्रह्मांडगोळ । इच्छा परततां तत्काळ । क्षणें निर्मूळे करिसी तूं ॥१६॥ अनंत बालादित्यश्रेणी । तव प्रभेमाजी गेल्या लपोनि । सकल सौभाग्य शुभकल्याणी । रमारमणवरप्रदे ॥१७॥ जय शंबरि पुहर वल्लभे । त्रैलोक्य नगरारंभस्तंभे । आदिमाये आत्मप्रिये । सकलारंभे मूलप्रकृती ॥१८॥ जय करुणामृतसरिते । भक्तपालके गुणभरिते । अनंतब्रह्मांड फलांकिते । आदिमाये अन्नपूर्णे ॥१९॥ तूं सच्चिदानंदप्रणवरुपिणी । सकल चराचर व्यापिनी । सर्गस्थित्यंत कारिणी । भवमोचिनी ब्रह्मानंदे ॥२०॥ ऐकोनि धर्माचे स्तवन । दुर्गा जाहली प्रसन्न । म्हणे तुमचे शत्रू संहारीन । राज्यीं स्थापीन धर्माते ॥२१॥ तुम्ही वास करा येथ । प्रगटी नेदीं जनांत । शत्रू क्षय पावती समस्त । सुख अद्भुत तुम्हां होय ॥२२॥ त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण । तें जे त्रिकाल करिती पठन । त्यांचे सर्व काम पुरवीन । सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥२३॥