श्री दुर्गा आरती (२)
आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ॥ प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ॥ मूलमंत्रजप करुनी भोंवते रक्षक ठेउनी हो ॥ ब्रह्माविष्णुरुद्र आईचें पूजन करिती हो ॥१॥ उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो । उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ध्रु०॥ द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ॥ सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥ कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ॥ उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ॥ उदो० ॥२॥ तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो ॥ मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो ॥ कंठींचीं पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ॥ अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो० ॥३॥ चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक जननी हो ॥ उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ॥ पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ॥ भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणीं हो ॥ उदो० ॥४॥ पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो । अर्थ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो । रात्रीचे समयीं करिती जागरण हरिकथा हो ॥ आनंदें प्रेम तेंआलें सद्भावें क्रीडतां हो ॥ उदो० ॥५॥ षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ॥ घेउनि दिवट्या हस्तीं हर्षें गोंधळ घातला हो । कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफळां हो ॥ जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ उदो० ॥६॥ सप्तमीचे दिवशीं सप्तश्रृंगगडावरी हो । तेथें तूं नांदसी भोंवतीं पुष्पें नानापरी हो ॥ जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो । भक्त संकटींपडतां झेलुनि घेसी वरचेवरी हो ॥ उदो० ॥७॥ अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायनी हो ॥ सह्याद्रीपर्वतीं पाहिली उभी जगज्जननी हो ॥ मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ॥ स्तनपान देउनि सुखी केलें अंतःकरणीं हो ॥ उदो० ॥८॥ नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ॥ सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो । षड्रसअन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो ॥ आचार्यब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरुनी हो ॥ उदो० ॥९॥ दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ॥ सिंहारूढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेउनी हो ॥ शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ॥ विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो । उदो० ॥१०॥