श्री तुळशी आरती (२)
जय देवी तुळशी माते बहु पुण्यपावनी । तुज करितो आरती ही लीन पदी होउनी ॥ध्रु०॥ त्रिभुवन हें लघु आहे तव पत्राहुनि अति । मुळिं ब्रह्मा मध्यें शौरी राहे तो बहु प्रीतीं ॥ अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारीं शोभती । दर्शनें तुझ्या पापे हरती गे मुळिहुनी ॥ जय० ॥१॥ तव छाया शीतल दे व्यापक तूं भूतळी । बहु प्रीती मंजिरीची विधिजनका लागली ॥ तव दलावीण होते बहु त्यांते काहिली । कार्तिकी बहु आहे तव महिमा या जनीं ॥ जय० ॥२॥ अच्युता माधवा हे मधुसूदना जगत्पती । तव पूजनीं बहु प्रेमें ऎसें जे गर्जती । देशी त्यां संततीही सुख सारें बहु प्रीती । विठ्ठलात्मज विनवि भावें मज तारी स्वामिनी ॥ जय० ॥३॥