श्री चंद्रदेव आरती
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा । आरतीं ओंवाळूं पदिं ठेउनि माथा ॥ध्रु०॥ उदयीं तुझ्या हृदयीं शीतलता उपजे । हेलावुनि क्षीराब्धी आनंदें गर्जे । विकसित कुमुदिनि देखुनि मन तें बहु रंजे । चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय० ॥१॥ विशेष महिमा तुझा न कळे कोणासी । त्रिभुवनिं द्वादशराशी व्यापुनि आहेसी ॥ नवही ग्रहांमध्ये उत्तम तूम होसी । तुझें बल वांछिती सकळहि कार्यासी ॥ जय० ॥२॥ शंकरगणनाथादिक भूषण मिरवीती । भाळीं मौळी तुजला संतोषें धरिती ॥ संकटनामचतुर्थीस पूजन जे करिती । संतति संपद पावुनि भवसागर तरती ॥ जय० ॥३॥ केवळ अमृतरूप अनुपम्य वळसी । स्थावर जंगम यांचें जीवन आहेसी ॥ प्रकाश अवलोकितां मन हें उल्हासीं । प्रसन्न होउनि आतां लावी निजकांसीं ॥ जय० ॥४॥ सिंधूतनया इंदू बंधु श्रीयेचा । सुकीर्तिदायक नायक उडुगण जो यांचा ॥ कुरंगवाहनचंद्रा अनुचित हे वाचा । गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ॥ जय० ॥५॥