श्री कृष्ण आरती (२)

अवतार गोकुळीं हो, जन तारावयासी । लावण्यरूपडें हो, तेजःपुंजाळ राशी ॥ उगवले कोटीबिंब, रवि लोपला शशी । उत्साह सुरवरां, महाथोर मानसीं ॥१॥ जय देवा कृष्णनाथा, राई रखुमाईकांता । आरती ओंवाळीन, तुम्हां देवकीसुता ॥ध्रु०॥ कौतुक पहावया, माव ब्रह्मयानें केली । वत्सेंही चोरुनियां, सत्य लोकासी नेलीं ॥ गोपाळ, गाई, वत्सें दोहीं ठायीं रक्षिलीं । सुखाचा प्रेमसिंधू, अनाथांची माउली ॥ जय० ॥२॥ चारितां गोधलें हो, इंद्र कोपला भारी । मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारीं ॥ रक्षिलें गोकुळ हो, नखीं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ, अवतरले हरी ॥ जय० ॥३॥ वसुदेव देवकीची, बंद फोडिली शाळ । होऊनियां विश्वजनिता, तयां पोटिंचा बाळ ॥ दैत्य हे त्रासियेले, समूळ कंसासी काळ । राज्य दे उग्रसेना, केला मथुरापाळ ॥ जय० ॥४॥ तारिले भक्तजन, दैत्य सर्व निर्दाळून । पांडवां सहकारं अडलिया निर्वाणीं । गुण मी काय वर्णूं, मति केवढी वानूं । विनवितो दास तुका, ठाव मागे चरणीं ॥ जय ० ॥५॥

Other Similar Pages