श्री कृष्ण आरती (१)
श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी । आरति करितों बहुप्रेमानें भवभयसंकट दूर करीं ॥ध्रु०॥ दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवरतसी । भक्तकाजकल्पद्रुम म्हणुनी निशिदिनीं ध्याती भक्त तुशीं ॥ अतिविषधर जो काळा फणिवर कालिया यमुनाजलवासी । तत्फणिवर तूं नृत्य करूनी पोंचविलें त्या मुक्तीसी ॥१॥ कैटभ चाणुर कंसादिक हे शौर्यें वधिले अमित अरी । नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिति लीला बहुत परी ॥ अपार महिमा श्रवण करोनी भजली त्यातें मुक्त करी । दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी ॥२॥